सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी कारखान्याने २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या शेतकर्यांना २७०० रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. मात्र, काही शेतकर्यांचे उर्वरीत १२०० रुपये दिवाळीपूर्वी दिले जातील, अशी घोषणा केली. सिध्देश्वर कारखाना पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना साहित्यरूपाने मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी काडादी म्हणाले की, गेल्यावर्षी नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती आणि सरकारी धोरणांमुळे कोणत्याही साखर कारखान्यांना चांगल्या पद्धतीने उसाचे गाळप करता आले नाही. आपल्या कारखान्याने २ लाख ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप कमी झाल्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर झाला आहे. सरकारने एफआरपी वाढवली तरी साखरेचे दर वाढवलेले नाहीत. साखर विक्रीची कोटा पध्दत ठरवून दिली जाते. त्यामुळे इतर कारखाने एफआरपीचे पूर्ण रक्कमही देऊ शकत नाहीत. गेल्यावर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे सभासदांना दरवर्षी मिळणारी ५० किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देऊ. नंतर चालू वर्षातील साखरही सभासदांना वाटप करणार असल्याची ग्वाही काडादी यांनी दिली.