कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर (गोडसाखर) कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या कारकिर्दीतील २९ कोटी ७१ लाखांच्या गैरव्यवहाराची फिर्याद मीच नोंदवली आहे. सरकारकडून त्याची चौकशी सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही. संबंधितांकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करू, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी दिली. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
अध्यक्ष पताडे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यातून कारखान्याच्या मशिनरीचे नूतनीकरण व आधुनिकीकरण सुरू आहे. आधुनिक अर्कशाळा व इथेनॉल प्रकल्पासह कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उद्दिष्टपूर्तीसाठी ऊस उत्पादक सभासदांनी सहकार्य करावे. कारखाना पुन्हा गतवैभव मिळवेल. यावेळी कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी नोटीस वाचन केले. सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी संचालक शिवाजी खोत यांच्या प्रश्नांना पताडे यांनी उत्तरे दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, संग्रामसिंह कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गड्डाण्णावर, सतीश पाटील आदींची भाषणे झाली. जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाबूराव गुरबे, हेमंत कोलेकर, रमेश आरबोळे, प्रकाश पाटील, गुंड्या पाटील आदी उपस्थित होते. संचालक अक्षय पाटील यांनी आभार मानले.