सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. चालू वर्षीच्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभही झाला. यावेळी मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला दिवाळी सणासाठी प्रतिटन दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अभिजित पाटील यांनी केली. आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३३०० रुपये दर मिळाला आहे. उर्वरित रक्कम टप्याटप्याने दिली जाईल, असे आश्वासनही आमदार पाटील यांनी दिले.
आमदार पाटील म्हणाले की, कारखान्याने यावर्षी किमान २० लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिदिन १४ हजार टन ऊस गाळप करण्यात येणार आहे. जादा गाळप होणार असल्याने कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. यावर्षी कारखान्याने स्वभांडवलातून यंत्रणा उभी केली आहे. कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ आली नाही. कारखाना सुरळीत चालू असताना काही लोक विनाकारण तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कार्यकारी संचालक गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे, डॉ. बी. पी. रोंगे, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.