कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेची बातमी जाहीर होताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘एनसीडीसी’मार्फत या कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला गती मिळत असल्याचे वृत्त समोर येताच शेतकरी, वाहतूकदार, कामगारांत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मंगळवारी लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कारखान्याची पाहणी करण्यासाठी एक कंपनी येणार असल्याची कुणकुण लागताच पुन्हा सारेजण एकवटले. ही माहिती येणाऱ्या कंपनीला लागताच ती माघारी फिरली. ‘दौलत’चा लिलाव होऊ द्यायचा नाही, शेतकऱ्यांच्या रक्ताने उभारलेला हा कारखाना वाचवायचा, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, सन २०११-१२ मध्ये जेव्हा केडीसीसी बँकेने दौलत कारखाना ताब्यात घेण्याची कारवाई केली होती, तेव्हाही शेतकऱ्यांनी, सभासदांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज पुन्हा होऊ नये म्हणून शेतकरी बांधव संघटित होत आहेत. सभासद शेतकरी व कामगार एकमुखाने ठराव करत सरकार व एनसीडीसी बँक यांना इशारा दिला. लिलाव प्रक्रियेला कोणतीही चालना दिली गेल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि कारखाना वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही शेतकरी देऊ लागले आहेत.