अहिल्यानगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वच कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा सुरू आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचे गाळप क्षमता वाढविल्याने उसाची पळवापळवी चांगलीच होईल अशी शक्यता आहे. जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस पुरवठ्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अशावेळी गणेश साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षात दिलेल्या ऊस दराचा संदर्भ देत शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. ऊस दराचा मुद्दा वारंवार उपस्थित होऊ लागल्याने साखर कारखानदारांची कोंडी होणार आहे.
पूर्वी आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षांत दमदार कामगिरी केली. कारखान्याने शेतकऱ्यांना अनुक्रमे ३००० व २८०० रुपये प्रति टन ऊस दर दिला आहे. कोणत्याही उपपदार्थांची निर्मिती नसताना केवळ साखर उत्पादनांवर एफआरपीपेक्षा अधिक दर देणारा हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. याशिवाय, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी काही पैसे खात्यात वर्ग केले जाणार आहेत. एफआरपीपेक्षाही जादा दर कारखान्याने दिला आहे. तसा ठराव माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कारखान्याचे मार्गदर्शक असलेले युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तेथील सभेत घेण्यात आला. याबाबत संचालक डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सांगितले की, कारखान्यात कामगारांचे पगार वेळेवर दिले जात आहेत. आता दिवाळीपूर्वी बोनस दिला जाईल. गणेश कारखान्याची ही कामगिरी पाहता इतर कारखान्यांवर ऊस दर चांगला देण्याचे आव्हान असल्याचे मत शेतकऱ्यांचे आहे.