ग्वाल्हेर : सध्या मान्सून निघून गेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात सतत नवीन प्रणाली तयार होत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. आणि ते उत्तर प्रदेशकडे सरकत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान सतत बदलत आहे. ग्वाल्हेरमध्ये हवामान आधीच बदलू लागले आहे. हवामान विभागाने, ग्वाल्हेर प्रदेशात ५ ते ७ ऑक्टोबर यांदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर सध्याच्या कालावधीत पाऊस कोसळला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
उपसागरातील आधीच्या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाऊस पडला आहे आणि आता एक नवीन प्रणाली उत्तर भारताकडे सरकत आहे. चक्रीवादळ देखील विकसित होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वाढत आहे. त्याचा फटका पिकांना बसू शकेल. सध्या भाताचे पीक कापणीच्या स्थितीत आहे. आणि पावसामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. मोहरीच्या पेरणीस उशीर झाला आहे. १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनावर परिणाम होईल. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली आहे. काल कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. त्यामुळे दमट उष्णतेपासून आराम मिळून थोडासा थंडीचा परिणाम जाणवला. किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस होते. मात्र, हवेतील आर्द्रता आणि थंडपणामुळे वातावरण आल्हाददायक झाले.