काटामारी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कारखान्यांना हिसका दाखवतो : मुख्यमंत्री फडणवीस यांचा सज्जड इशारा

अहिल्यानगर: शेतकऱ्यांवर आपत्ती आली, त्यांना मदत करण्यासाठी पाच रुपये मागितले, तर तुम्ही त्यात राजकारण करता. शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या एफआरपीमधून नव्हे तर साखर कारखान्यांच्या नफ्यातून मागितले. काही लोकांनी त्याचे राजकारण केले. शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारून पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपये देण्याची दानत नाही. राज्यात असे काही कारखाने आहेत, जिथे काटामारी केली जाते, त्यातून शेतकऱ्यांना लुटले जाते. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कारखान्याना मी हिसका दाखविणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे कपातीच्या निर्णयाबाबत खुलासा करताना लोणी (ता. राहाता) येथे झालेल्या सभेत फडणवीस म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पुराने आपत्ती आली आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी सरकार काम करत आहे. मी असे काही कारखाने शोधले आहेत की तिथे काटा मारला जातो. शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारता आणि पंचवीस लाख रुपये मदतीसाठी मागितले, की त्यात राजकारण करता. उसाचा काटा मारणाऱ्या अशा कारखान्यांना मी आता हिसका दाखवणार आहे.”यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली.

ते म्हणाले, सहकारी संस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने आठ ते दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सहकार कारखानदारीला बळकटी दिली. साखर कारखानदारीतील मक्तेदारी मोडीत काढली. कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे तुम्ही मालक नाहीये, याचा मालक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकार करेल. अहिल्यानगर जिल्हा तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, बहुतांश मंजुऱ्या मिळाल्या असल्याचे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here