शिर्डी : केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३,१३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १,६३१ कोटी वाटप करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. आता अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.
लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण प्रारंभप्रसंगी शाह बोलत होते. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, असेही शाह यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. शाह म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा १० हजार कोटींहून अधिक प्राप्तिकर माफ केला आहे. यामुळे सहकारी साखर कारखान्यांवरील वार्षिक १०० कोटींचा कर भार दूर झाला आहे.
साखर उत्पादनासाठी लागणाऱ्या मोलायसिसवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असून ३९५ वस्तूंवरील जीएसटी दरही घटविण्यात आले आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला. १९५१ मध्ये ५० टन क्षमतेने सुरू झालेला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ७,२०० टन क्षमतेने कार्यरत आहे. लवकरच त्याची क्षमता १५ हजार टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. डिस्टिलरीची क्षमता ९० केएलपीडीपर्यंत वाढली असून २४० केएलपीडीपर्यंत विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे.
याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, अमोल खताळ, आशुतोष काळे, किरण लहामटे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.