सोलापूर : यंदा मे महिन्यापासून सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. वीर, भाटघर आणि उजनी धरणातून नियमीत पाणी मिळाल्याने यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनातही मोठी वाढ अपेक्षीत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या हंगामात किमान ४० लाख टनांनी वाढ होईल असा अंदाज सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान १५० ते १६० लाख टन उसाचे गाळप होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. तर अतिवृष्टी, महापुरामुळे सुमारे १० ते १५ लाख टन ऊसाचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. आता पर्यंत सोलापूर विभागातील ४० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.
जिल्ह्यात साधारण एक नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होईल. जिल्ह्यात सर्वाधिक ३७ साखर कारखाने आहेत. यापैकी किमान ३२ ते ३३ साखर कारखाने सुरू होतील. त्याद्वारे विक्रमी १६० लाख टनापर्यंत उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी केली आहे. आतापर्यंत विभागातील ४० कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर जिल्ह्यात अतिवृष्टीबरोबरच सीना आणि भीमानदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या जवळपास १० ते १५ लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सहसंचालकांनी राज्य सरकार आणि साखर आयुक्तांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही खाजगी कंपनीला कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये, अशी नोटीस भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला दिली आहे