सोलापूर : श्री संत कुर्मदास कारखान्याची गाळप क्षमता कमी असून इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालवित आहोत. तरीसुध्दा आसपासच्या कारखान्याइतका ऊस दर दिलेला आहे. आता आगामी काळात सहवीज निर्मिती प्रकल्प, सीबीजी निर्मिती प्रकल्प व तसेच मशिनरी विस्तारीकरण इत्यादी प्रकल्प राबिवण्याचे संचालक मंडळाचे धोरण आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार धनाजीराव साठे यांनी दिली. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे म्हणाले की, आगामी काळात अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेसाठी मशिनरीचे विस्तारीकरण करुन १४ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प निर्मिती केली जाईळ. प्रतिदिनी ५ मेट्रिक टन सी. बी. जी. प्रकल्प उभारणीचे काम लवकर सुरू करणार आहोत. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करुन घेवून प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक निधीसाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे लवकरच कर्ज मागणी प्रस्ताव दाखल करणार आहोत. येत्या हंगामामध्ये साडेतीन लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभेत विजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक रविंद्र पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष सुधीर पाटील, संचालक दादासाहेब साठे यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते. संचालक नारायण गायकवाड यांनी आभार मानले. लक्ष्मण राऊत यांनी सूत्रसंचालन केले.