सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये याप्रमाणे संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली होती. आता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संचालक मंडळाने दिवाळीसाठी शेतकऱ्यांना आणखी १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिटन १०० रुपये हप्ता देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची पूर्तता केली जात असल्याने ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
याबाबत कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी सांगितले की, कारखान्याने आधीच ३२०० रुपये प्रती टन असा दर दिला आहे. त्यानंतर १०० रुपये दिवाळीसाठी देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार २०२४-२५ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचा हा दुसरा हप्ता नुकताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ७४ लाख रुपये बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा. आगामी गळीत हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करावा.