अहिल्यानगर : कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या कॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे प्रमुख उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी याच पद्धतीने देशात १५ सहकारी कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे सीबीजी युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकार निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल, अशी घोषणा केली.
केंद्रीय मंत्री शहा पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. तशीच व्यवस्था सहकारी साखर कारखान्यांमध्ये असायला हवी. चक्रीय अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. इथेनॉल प्रकल्प बहुआयामी करण्याची आवश्यकता आहे. फळांच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकडेही लक्ष दिले पाहिजे. फळांचे प्रोसेसिंग येथे झाले तर साखर कारखाने नफ्यात राहतील. देशाने कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भरता मिशन’ सुरू केले. त्यासाठी ११,३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या सहकार विभागाने मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारीसाठी योजना आणून निधी उपलब्ध करून दिला. इथेनॉल क्रांतीमुळे परकीय चलन वाचले आहे.