सोलापूर : मोहोळ तालुक्यातील ४ साखर कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहेत. चारही साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ४९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. २०२५-२६ या चालू गाळप हंगामात २९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उदिष्ट या साखर कारखान्यांनी ठेवल्याचे कारखान्यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे हंगामाची लगबग सुरू होईल, असे दिसते. कारखाने सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आतील यंत्रांची व अन्य कामे प्रगतिपथावर आहेत.
तालुक्यात लोकनेते साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १६ लाख मे. टन, भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ११ लाख, आष्टी शुगरच्या कार्यक्षेत्रात १२ लाख तर जकराया कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. गेल्यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने चालू गाळप हंगामात ऊस गाळपासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. चारही कारखान्यांनी ४६ ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या मनमानीला चाप बसणार आहे. दरम्यान, सीना नदीला आलेल्या पुरामुळे व नदी काठच्या गावातील ऊस वाहून गेल्याने त्याचा सुमारे एक लाख मे. टनाचा फटका साखर कारखान्यांना बसणार आहे. नदीकाठचा ऊस पाण्यात असल्याने उसाची वाढ करणाऱ्या मुळ्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्याचा ऊस वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले की, यंदा सुमारे चार महिने कारखाने चालतील. सरकारने १ नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली ती ही योग्यच आहे. थंडी वाढली तर साखर उताराही वाढणार आहे.