पुणे : राज्य सरकारने राजगड सहकारी साखर कारखान्याला ४६७ कोटी रुपये कर्जहमी दिली आहे. नवीन कारखान्याच्या निर्मितीमुळे प्रतिदिन ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता, ६० के. एलपीडी डिस्टीलरी प्रकल्प, १२ मेगावॅट वीज निर्मिती, ५ टन सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्यामुळे इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देता येणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले. भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील फार्मसी हॉलमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांशी थोपटे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्जहमीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
माजी आमदार थोपटे म्हणाले, संचालक मंडळ कार्यक्षेत्रात अधिक प्रमाणात ऊसाची लागवड व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन व्हावे याकरिता ऊस लागवड माहिती, ऊसाचे बियाणे, लागणारी खते, आधुनिक तंत्रज्ञान या सर्व बाबींची माहिती शेतकरी बांधवांना पुरवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शेत रस्ते, वीज समस्या, सिंचन योजना, ऊसतोडणी यंत्रणा याबद्दल शेतकऱ्यांनी सूचना यावेळी मांडल्या. कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, प्रभारी कार्यकारी संचालक आव्हाड, माजी संचालक विठ्ठल कुडले, मा. कृषी अधिकारी प्रगतशील शेतकरी संपत थोपटे उपस्थित होते.