कोल्हापूर : येथील गुरुदत्त शुगर्सच्या कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गुरुदत्त शुगर्सच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले. धाराशिव जिल्ह्यातील भूम, ढगे चिंचपूर, वाल्हा, हिवरडा, भव्हाणवाडी, वाशी व सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील एक हजार पूरग्रस्त कुटुंबियांना शालेय साहित्य व जीवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात गरजू पूरग्रस्तांना साहित्य पोहोच करण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे यांचे सहकार्य मिळाले.
याबाबत बोलताना गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे म्हणाले की, गुरुदत्त शुगर्सतर्फे पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. आमच्या कर्मचाऱ्यांनी केवळ पगार, बोनस वा आर्थिक लाभापुरते मर्यादित राहून कधी काम केले नाही, तर समाजाच्या हितासाठी व गरजूंसाठी सदैव योगदान दिले आहे. महापूर, कोरोनासारख्या आपत्तीमध्ये व इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगर्स नेहमी अग्रभागी राहिला. दरम्यान, अनेक वाड्यांमध्ये पावसामुळे पूल, रस्ते वाहून गेल्यामुळे तेथील लोकांना मदत पोहोचली नव्हती. तेथे जाऊन कर्मचाऱ्यांनी मदत पोहोच करून आधार दिल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.