कोल्हापूर : जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने दालमिया साखर कारखान्याला गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला जादाचा ३०० रुपयांचा हप्ता हंगामपूर्वी मिळावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. कारखाना प्रशासनाच्यावतीने जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी आणि एचआर प्रमुख सुहास गडाळे यांनी हे निवेदन स्वीकारले. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शिवप्रसाद देसाई, सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, नानासो इंगळे, तातोबा कोळी, पांडुरंग इंगळे, अशोक चव्हाण, भगवान कांबळे, धनाजी कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने दालमिया कारखाना प्रशासनाबरोबर दुसऱ्या हप्ताबाबत चर्चा केली. याबाबत संघटना व अधिकाऱ्यांत सकारात्मक चर्चा झाली. शिवाजी माने यांनी यापूर्वी दालमिया प्रशासनाने, दुसरा हप्ता दिल्याबद्दल संघटनेने अभिनंदन केले. ऊस उत्पादन करताना शेतकरी कसा अडचणीत येत आहे याचा लेखाजोखा कारखाना प्रशासनासमोर मांडला. दरम्यान, बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर, आसुर्ले- पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया शुगर, असळज (ता. गगनबावडा) येथील डॉ. डी. वाय पाटील या तीन कारखान्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जय शिवराय संघटनेने निवेदन दिले आहे. कारखान्यांनी हंगाम चालू होण्यापूर्वी दुसरा हप्ता दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा साखर कारखानदारांना दिला आहे.