अहिल्यानगर : थोरात कारखान्याकडून प्रतिटन २०० रुपयांचा हप्ता, कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदा दिवाळीनिमित्त ऊस उत्पादकांना मागील हंगामासाठी कार्यक्षेत्रात २०० रुपये प्रतिटन व कार्यक्षेत्राबाहेर १०० रुपये प्रतिटन देण्यात येणार आहेत. कामगारांना दरवर्षीप्रमाणे २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल अशी घोषणा माजी कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, अॅड. माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, संतोष हासे, संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याने कायम सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत गौरवास्पद वाटचाल केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर यशस्वी वाटचाल करताना थोरात सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर लौकिक निर्माण केला आहे. उच्चांकी भाव देताना कायम शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. आता कारखाना देत असलेल्या २०० रुपयांच्या हप्त्यामुळे ऊस उत्पादकांना ३२०० प्रति टन भाव मिळणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकात सभासदांना ३० किलो मोफत साखर दिली जाईल अशी घोषणा केली. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here