कोल्हापूर : राज्यातील काही साखर कारखाने उसाचे वजन करताना काटामारी करतात, हे आपण शोधून काढल्याचे मुख्यमंत्र्यांनीच नुकतेच लोणी (जि. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमात जाहीर केले. त्यामुळे आता यावर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. साखर कारखान्यांचा काटा पारदर्शक करण्यासाठी वे इंडिकेटरला संगणक जोडण्यास मज्जाव करावा, सर्व काटे ऑनलाइन करून त्याचे एकत्रित नियत्रंण मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांना कडक इशारा दिल्याने शेतकरी संघटनांनी वर्षानुवर्षे मांडलेला प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. दरवर्षी राज्यात १२ कोटी टन उसाचे गाळप केले जाते. यातील पाच टक्के काटामारी होत असल्याचा अंदाज आहे. यातून हंगामात साधारणपणे ६० लाख टन ऊस काटामारी केला जात असल्याचा शेतकरी संघटनांचा अंदाज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमोरच काटामारीचा विषय मांडला. यापूर्वी शेतकरी संघटनांनी अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित केला आहे. कारखान्यांकडून वे इंडिकेटरला संगणक जोडल्यास काटामारी करणे सहज शक्य होते. वे इंडिकेटरला केवळ प्रिंटर जोडणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाइन करून त्याचे नियंत्रण सरकारने केल्यास त्यामध्ये छेडछाड झाल्यास नियंत्रण कक्षाला ते कळणे सोपे होणार आहे. उसाचे वजन शेतकऱ्यांना त्वरित कळण्यास काहीच अडचण नाही. यासाठी वजन केल्यावर सेंकदात मेसेज यावा, अशी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. याबाबत गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काटामारीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आमच्या कारखान्यात कधीही काटामारी केली जात नाही. तर आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी काटामारी रोखायची असेल, तर वे इंडिकेटरला संगणक जोडायचा नाही, असा आदेश सरकारने काढावा.