कोल्हापूर : कारखानदार उसाच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकार त्यांना साथ देत आहे. एकरकमी एफआरपीसाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोळा ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या २४ व्या ऊस परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. माणगाव (ता. चंदगड) येथील माणकेश्वर मंदिरात ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेत अध्यक्ष शेट्टी बोलत होते. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रा. दीपक पाटील, जगन्नाथ हुलजी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले की, १९९६ चा शुगर कंट्रोल ॲक्ट शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी राज्य सरकारने २०२२ मध्ये अधिकार नसताना त्यामध्ये बदल केला. विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात पाठपुराव्यानंतर केस जलद चालली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला. त्याविरोधात पुन्हा सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करण्यात कारखानदारांचे एकमत झाले असल्याने शेतकऱ्यानी एकजुटीने याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे शासनाने कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन जोडावेत. देशातील लाखो पेट्रोल पंप ऑनलाईन जोडले जाऊ शकतात. तर मग राज्यातील २०० साखर कारखाने ऑनलाईन का जोडले जाऊ शकत नाहीत? असा सवाल शेट्टी यांनी केला.