अहिल्यानगर / मुंबई : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार काशिनाथ दाते यांच्या पुढाकाराने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या कारखान्याची विक्री चुकीच्या मार्गाने झाल्याने राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे कारखान्याचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, याचे सविस्तर सादरीकरण कारखाना बचाव समितीने बैठकीत केले.
या साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे प्रमुख अॅड. रामदास घावटे यांनी दिली. कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव बचाव समितीने पूर्वीच राज्य शासनाकडे दिला आहे असे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, अॅड. रामदास घावटे, संतोष वाडेकर, बाळासाहेब बोरकर, साहेबराव मोरे, बबन कवाद, दिगंबर लाळगे, महेंद्र पांढरकर, संतोष यादव, सुनील चौधरी, शंकर गुंड, जालिंदर लंके, रोहिदास लामखडे, बबनराव सालके, संभाजी सालके, बाबाजी गाडीलकर, रामदास सालके, संतोष सालके, गोविंद बडवे, बाळासाहेब वाळुंज आदी उपस्थित होते.