सांगली : क्रांती कारखान्याने ऊस उत्पादकांच्या निष्ठेमुळे प्रेम, विश्वास व सहकार्यामुळेच सर्व हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत. कारखान्याने देशपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. आता कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टन केली आहे. यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे,” अशी माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. कारखान्याच्या २९व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार अरुण लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उदय लाड, व्ही. वाय. पाटील, किसान संस्थेचे संस्थापक अनिल लाड, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे आदी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष लाड म्हणाले की, कारखाना १६ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्याने गेल्यावर्षी जिल्ह्यात उच्चांकी, ९,९१,२९० टन ऊस गाळप केला. एकूण १०,८५,५५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कारखान्याने ३२०० रुपये प्रति टन ऊस बिल दिले. कारखाना ऊस उत्पादक सभासदांसह बिगर ऊस उत्पादकांचाही कायम आदर व सन्मान केला जातो. क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी क्षारपड मुक्तीचे प्रकल्प राबविणार आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जास्तीत जास्त ऊस उत्पादित करण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे यांनी अहवाल व विषय पत्रिकेचे वाचन केले. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.