कोल्हापूर : रोजगार हमी योजनेतून अनुदानावर आधारित ‘उसाच्या बांधावर नारळ लागवड’ ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. निव्वळ एका पिकावर अवलंबून न राहता शेताच्या बांधावरही लागवड करून आर्थिक उन्नती साधण्याची संधी याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत टप्प्याटप्प्याने प्रति रोप १२५० रुपयेप्रमाणे २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले जाणार आहे.
उसाच्या शेतीबरोबरच नारळ लागवडीचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यातून करता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २४ गावांची यासाठी निवड केली असून, प्रत्येक तालुक्यातील दोन गावांत किमान १०० शेतकऱ्यांना ही लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे गावांची निवड केली असून, ७८७ लाभार्थी निवडले आहेत. आतापर्यंत सुमारे ७०० रोपांची लागवड केली आहे. प्रतिरोपाला अनुदान दिले जाणार आहे. ऊसशेतीच्या भोवती नारळ झाडांची लागवड हा नाविन्यपूर्ण उपक्रम यानिमित्ताने ठरणार आहे.
उसाच्या शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा उपयोग बांधावरील झाडांना होईल. ऊस पिकाची देखभाल करतच या झाडांची चांगली वाढ करण्यासाठीचे प्रयत्न सहज शक्य होणार आहेत. शेतकऱ्याला पाच एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. एका हेक्टरमध्ये मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिलेल्या आकारात रोपांची लागवड करावी लागणार आहे. २० रोपे लावण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज करून जॉब कार्ड काढून घ्यावे. त्यानंतर सहभागासाठी अर्ज करावा. मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी याची तपासणी करून त्या अर्जाला मंजुरी देतात.