सातारा : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याने २०२४-२५ मधील हंगामात गळितास आलेल्या उसासाठी ३२६० रुपयांचा अंतिम दर जाहीर केला. कारखान्याने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपये अदा केले आहेत. उर्वरित ६० रुपयांचा अंतिम हप्ता आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. कारखान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामात ५ लाख ५० हजार उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा १२.५२ टक्के राहिला. कारखान्याने गेल्या गळीत हंगामासाठी ३२६० रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. त्यापैकी ३२०० रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे. आज विनाकपात ६० रुपयांचा अंतिम हप्ताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे डॉ. भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.