पुणे : आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखाना सन २०२४- २५मध्ये गाळपास आलेल्या उसाला दिवाळी सणासाठी १२५ रुपये प्रतिटनाप्रमाणे हप्ता देणार आहे. त्यामुळे कारखान्याचा अंतिम दर तीन हजार रुपये झाला आहे. तसेच, कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मोफत पाच किलो साखर (रिफाईन शुगर) देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.
दौंड शुगर साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व १७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम, तसेच कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे व त्यांच्या पत्नी डॉ. संगीता जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कदम बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रताप पाटील, वैशाली पाटील, उत्तम आटोळे, महेश भागवत, रंगनाथ फुलारी, इंद्रजित जगदाळे, अमित गिरमकर, सरपंच हंबीर धुमाळ, लक्ष्मण कदम, विलास डोंगरे, पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड आदी उपस्थित होते. ऊस विकास अधिकारी संदेश बेनके यांनी सूत्रसंचालन केले.