सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढत आहे. मात्र सातारा जिल्ह्याची अपेक्षित साथ मिळत नाही अशी खंत संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. स्वाभिमानीची जिल्हास्तरीय बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत शेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली. यंदाही संघटनेने ऊस दराच्या मुद्यावरून एल्गार पुकारला आहे. जयसिंगपूर येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.
शेट्टी म्हणाले की, तरुण शेतकरी शेतीत उतरल्याने अन्याय सहन करणार नाहीत. ऊस दर ठरवण्यासाठी यंदा संघर्ष अटळ आहे. वारकरी जशी पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तशी जयसिंगपूरची ऊस परिषदही शेतकऱ्यांनी चुकवू नये. दरम्यान, जर कारखानदार सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा बैठकीत देण्यात आला. तालुकानिहाय निरीक्षक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य उमेदवारांना संधी देण्यासाठी संघटना प्रयत्न करेल, असे सांगण्यात आले. बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाबाबतही चर्चा झाली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.