लखीमपुर-खिरी : साखर कारखाने पुन्हा सुरू होण्यास अजून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कमी दरात ऊस गुऱ्हाळघरांना विकावा लागत आहे. आगामी काळातील सणांसाठी शेतकऱ्यांना तातडीने रोख रकमेची आवश्यकता आहे. साखर कारखाने सामान्यतः नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. मात्र, अद्याप कारखान्यांनी दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस गुऱ्हाळघरांना २४० ते २५० रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागत आहे. हा दर बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे.
साखर कारखान्यांकडून वेळेवर ऊस बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किमतीला उसाची विक्री करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अद्याप भाताचे पीकही तयार झालेले नाही. याबाबत प्यारेलाल, सेवक राम, सुरेश कुमार, रझा हुसेन, अवतारी लाल आणि अथर अली यांसारख्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, कमी किमतीत ऊस विकून शेतीचा खर्चही वसूल करणे कठीण आहे. जेव्हा घर चालवण्याची चिंता असते, तेव्हा तोट्याचा सौदा करावा लागतो. सरकारने ऊस बिले मिळण्याची खात्रीशीर सोय करावी, तरच कमी किमतीत ऊस विक्री बंद होईल. प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेण्याचे आणि शेतकऱ्यांना कमी किमतीत त्यांचे कष्टाचे उत्पन्न विकावे लागू नये म्हणून मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.