सोलापूर : यंदा एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरवात होणार आहे. मात्र जिल्ह्यात सीना आणि भीमा या नद्यांच्या काठावरील शेतांमध्ये अतिवृष्टीसह महापुरामुळे आठवडाभर पाणी साचून राहिले. त्यामुळे सुमारे १५ ते २० लाख टन उसाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३४ कारखान्यांपैकी काही कारखान्यांचा गाळप हंगाम जानेवारीतच आटोपला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक ऊस उपलब्ध असल्याने हंगाम दीर्घकाळ चालेल, असे अपेक्षा होती. मात्र, महापुराने झालेल्या नुकसानीचा सीना नदीकाठच्या उसावर अवलंबून असलेल्या दहाहून अधिक कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे. हत्तरसंग कुडल येथे सीना-भीमा नद्यांचा संगम झाल्यानंतर पुढे पाण्याचा प्रवाह वाढल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतीलाही अधिक फटका बसला आहे. भोगावती, बोरी नद्यांच्या काठावरील ऊस शेतीचेही नुकसान झाले आहे. ही स्थिती पाहता १५ ते २० लाख टन उसाचे नुकसान झाल्याचा कारखानदारांचा अंदाज आहे. दैनिक सकाळ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जिल्ह्यात यंदा ८३ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात ३८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने साडेतीन हजार हेक्टर उसाचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीसह सीना, भोगावती व बोरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या उसावर अवलंबून असलेल्या कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले म्हणाले की, अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सद्यस्थितीत, नदीकाठावरील उसाचे १० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर लोकनेते बाबूराव अण्णा पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजन पाटील म्हणाले की, पुरानंतर कारखान्याने कर्मचाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केले. एकरी ४० टन उत्पादन गृहित धरून केलेल्या या सर्वेक्षणात ६० हजार टन उत्पादन घटणार असल्याचे आढळून आले आहे. एकट्या मोहोळ तालुक्याची ही स्थिती पाहता, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.