पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये तुटून आलेल्या उसाला ३४५० रुपये प्रति टन अंतिम ऊसदर जाहीर केला. संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि. १०) झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्षा संगीताताई कोकरे यांनी ऊसदर जाहीर केला. यावेळी सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते. माळेगाव साखर कारखान्याने सदर ऊस बिलापोटी या अगोदर ३३३२ रुपये प्रति टन ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. आता उर्वरित ११८ रुपये प्रतिटन दोन दिवसात सभासदांच्या बँक खात्यावर जमा होतील, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
दरम्यान कारखाना प्रशासनाने गेटकेन धारकांना ३२०० रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला असून गेटकन धारकांनादेखील याअगोदर ऊस बिलापोटी ३१२५ रुपये प्रति टन दिले आहेत. उर्वरित ७५ रुपये प्रति टन रक्कम त्यांच्या खात्यावर दोन दिवसात जमा होतील. दुसरीकडे कारखाना कामगारांना २० टक्के बोनस जाहीर झाला असून, यामधील १५ टक्के बोनस दिवाळीसाठी व उर्वरित ५ टक्के बोनस मकर संक्रांती दरम्यान दिला जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
खोडवा उत्पादकांना १५० रुपये प्रति टन…
खोडवा ऊस उत्पादकांना १५० रुपये प्रति टन तर व्हरायटी उसासाठी १०० रुपये प्रति टन खत स्वरूपात अनुदान मिळणार आहे. एकूणच खोडवा ऊस उत्पादक सभासदांना ३६०० रुपये प्रति टन तर व्हरायटी ऊस उत्पादकांना ३५५० रुपये प्रति टन मिळतील. माळेगाव कारखाना प्रशासनाने ऊस बिलापोटी ११ कोटी ९७ लाख रुपये, कामगारांच्या १५ टक्के बोनस रकमेसाठी ३ कोटी ८१ लाख तर नुकतीच दिलेली ठेवीवरील व्याजाची रक्कम ३ कोटी ५८ लाख अशी एकूण १९ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.