सांगली : विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे ५० रुपये दुसरा हप्ता

सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यास सन २०२४-२५ मध्ये गाळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना ही दिवाळी गोड करण्यासाठी प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

नाईक म्हणाले, पूर्वी एकरकमी प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत. आता ५० रुपये देणार असून एकूण दर ३ हजार २७५ रुपये प्रतिटन झाला आहे. ‘विश्वास’च्या संचालक मंडळाने कामगारांनी १२ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्याबरोबर आज प्रतिटन ५० रुपये जाहीर करून कामगारांबरोबर शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. सन २०२४-२५ हंगामात साडेपाच हजार टन प्रतिदिनी प्रमाणे ४ लाख ४३ हजार १६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून ५ लाख ३२ हजार ७३० साखर पोती उत्पादन झाले होते.

ते म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी सातत्याने विश्वास कारखान्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत ‘विश्वास’ने दमदार वाटचाल केली आहे.

मानसिंगराव नाईक म्हणाले, साखर कारखानदारीपुढे अनेक अडचणी आहेत. असमतोल पावसामुळे गेल्या काही वर्षांत उसासह सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी कारखान्यास तोटा सहन करावा लागत आहे. तरीही विश्वास कारखान्यावर ऊस उत्पादकांनी विश्वास कायम ठेवला आहे. सर्व ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here