नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कर्जबाजारी कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणून गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली. इथेनॉल प्रकल्प सुरू झाला आणि सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज थकीत नसल्याचे अध्यक्ष शेट्ये यांनी स्पष्ट केले. पुढील काळात सीबीजी, सीएनजी, पोटॅश, हायड्रोजन व सौर प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले.
अध्यक्ष शेट्ये म्हणाले की, कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादकांचे हित जपत, त्यांना चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवावे. गेली चार वर्षे संस्थेला सातत्याने लेखा परीक्षणात अ वर्ग मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेत विरोधी गटातर्फे सुरेश डोखळे, सचिन बर्डे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. शेटे यांनी सर्व आरोप फेटाळले. सभेत संपूर्ण कर्जमाफीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, बाजार समिती सभापती प्रशांत कड, योगेश बर्डे, शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, बोपेगाव सरपंच वसंत कावळे आदी उपस्थित होते.