सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदतीची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी पाच दिवस ऊस व फळ बागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल तरच त्या पिकांचे नुकसान होते, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे नदीकाठ वगळता अन्य ठिकाणी उसाचे नुकसान झालेले नाही असे गृहित धरून पंचनामे करण्यात आले आहेत. तर अतिवृष्टी, महापुरामुळे पंचनामे करायला त्याठिकाणी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे नुकसानीच्या फोटोची अट शिथील करण्यात आली. मात्र, आता पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोटो घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण भरपाईपासून वंचित राहतील, अशी शक्यता आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे ५५० पेक्षा जास्त तालुक्यांमधील ४७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. मात्र, ऊस व फळबागांच्या क्षेत्राच्या पंचनाम्यांना अटी लादल्या आहेत. याबाबत तहसीलदारांनी सांगितले की, ‘कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे उसाचे नुकसान होत नाही, उलट उसाला पाण्याची गरज असते. पण, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ऊस किंवा फळबागा पाण्याखाली असतील तर नुकसान होते. त्या पिकातून पाच-दहा दिवस पाणी साचले किंवा वाहिल्यास वाढ खुंटून उत्पन्नात काही प्रमाणात घट होऊ शकते. त्यामुळे आम्ही अशी स्थिती कोणत्या शेतकऱ्यांची झाली आहे, याची खात्री करून पंचनामे केले आहेत. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले म्हणाले की, अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, हा सरसकट पंचनाम्याचा अर्थ आहे. सगळ्यांनाच मदत द्यायची असेल तर पंचनामे कशाला लागतात. दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई मिळावी हा हेतू आहे.