पुणे : केंद्र सरकार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) देशातील १५ साखर कारखान्यांना की १२ ते १५ प्रकारचे उपपदार्थ तयार करणाऱ्या प्रकल्पांसाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे. यात राज्यातील आठ कारखान्यांचा समावेश असेल. जर एनसीडीसीने चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केल्यास कारखाने पुढे येतील असे आम्ही कळवले आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सभागृहात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व आर्थिक शिस्त पाळणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची निवड संभाव्य प्रकल्पात केली जाईल. बगॅस व मळीपासूनचे उपपदार्थ तयार करणारे प्रकल्प राबवायचे झाल्यास भांडवल लागते. असे प्रकल्प केले तर ते फायदेशीर राहतात. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी साखर कारखान्यांना एनीसीडीसीमार्फतच्या कर्जपुरवठ्यातील व्याजाचा दर कमी करू शकतो, असे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.