बेळगाव : सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करून त्यांनी पिकवलेल्या उसास योग्य भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या सात वर्षांत केला आहे. यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अरिहंत शुगर्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन पाटील यांनी केले. जैनापुरात मंगळवारी अरिहंत शुगर इंडस्ट्रीजच्या आठव्या बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबावी व त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी दिवंगत रावसाहेब पाटील यांनी या साखर कारखान्याच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या सात वर्षांत शेतकरी व ऊस उत्पादकांसाठी विविध योजना हाती घेऊन सर्वच गाळप यशस्वी केले आहे. यंदा कारखान्याची गाळप क्षमता व अन्य बाबी वाढविण्यात आल्या आहेत. कामगारांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाही योग्य वेळी पगार व बोनस वाटपही आपण करीत आहोत.
उत्तम पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे साखर क्षेत्रातही आपण यशस्वी वाटचाल करीत आहोत. सर्व कारखानदारांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या उसास योग्य भाव देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रत्येक हंगाम यशस्वी होत आहे. यावेळी युवराज पाटील दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, वैष्णवी पाटील, कारखान्याचे सीईओ महावीर पाटील, प्रधान व्यवस्थापक चंद्रकांत बिरनाळे, शेती अधिकारी विजय बमनगी, मुख्य अभियंता सुधीर पाटील, रोहित कटगेरी, मुख्य केमिस्ट धन्यकुमार बलवान, सनत गणी, ऋषभबल्लोळ आदी उपस्थित होते.