पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत ऊस वजनकाट्यांची तपासणी करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी जारी केल्या आहेत. याबाबत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निर्देश जारी करण्यात आले आहेत. राज्यात एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम २०२५-२६ सुरू होत आहे. या काळात साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करावी आणि काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे भरारी पथकांमध्ये सर्व संबंधित घटकांचे प्रतिनिधी घेऊन अचानक भेटी देऊन गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी असेही साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी स्तरावर नियुक्त भरारी पथकात महसूल, पोलिस, वैद्यमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक साखर सहसंचालक व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. साखर कारखान्यांच्या प्रमाणात गरजेनुसार तालुकानिहाय भरारी पथकही स्थापन केले जाईल. त्यात संबंधित विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी सदस्य राहतील. पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात यावीत. भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखाना कार्यस्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्याची तपासणी करावी; शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते की नाही हे तपासावे अशी सूचना साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी केली आहे.