सोलापूर : थकीत ऊस बिलांपोटी धाराशिव जिल्हा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याचे प्रमुख, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या जोडभावी पेठेतील घरासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात धाराशिव, लातूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. उमरगा, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२३-२४ मध्ये मातोश्री साखर कारखान्यात ऊस गाळपासाठी पाठविला. या उसाचे बिल वेळेवर मिळाले नाही असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, कारखान्याने प्रतिटन २७०० रुपये भाव जाहीर केला होता. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन १८०० रुपये, १५०० रुपये आणि १ हजार रुपये याप्रमाणे बिल मिळाले. कारखान्याने जाहीर केल्यानुसार बिल मिळावे यासाठी शेतकऱ्यांना सिद्धाराम म्हेत्रे यांच्या घरासमोर उपोषणाला बसावे लागले. जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. यावेळी संजय बचाटे, चैतन्य बिराजदार, गणेश स्वामी, गुलाब माकणे, सूरज ठमके आदी उपस्थित होते.