बेळगाव : हिरण्यकेशी साखर कारखाना कार्यक्षेत्रात यंदा मुबलक ऊस आहे. सभासद, शेतकऱ्यांनी आपला ऊस हिरण्यकेशी कारखान्याला द्यावा. ऊस गाळपानंतर पंधरा दिवसांच्या आत बिले दिली जातील. कारखान्याने दहा-बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कामगारांना ८.३३ टक्के दिवाळी बोनसचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बसवराज कल्लटी यांनी दिली. हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. शिवलिंगेश्वर स्वामी, मल्लया स्वामी, आमदार शशिकला जोल्ले आदी उपस्थित होते. विठ्ठल देवस्थानचे पुजारी, दिवंगत अप्पणगौडा पाटील यांचे नातू संचालक मल्लिकार्जुन पाटील, सुनीता पाटील यांनी पूजन केले.
यावेळी शिवलिंगेश्वर स्वामी यांनी कारखान्यावर आलेले आर्थिक संकट तात्पुरते असल्याचे सांगितले. योग्य पद्धतीने कारखाना चालविल्यास हिरण्यकेशी पुन्हा एकदा या भागातील शेतकऱ्यांची कामधेनू ठरेल असे ते म्हणाले. तर आमदार शशिकला जोल्ले यांनी दिवंगत अप्पण्णगौडा पाटील यांनी या भागातील सभासद, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही दिली. संचालक बाबासाहेब आरबोळे यांनी स्वागत केले. लक्ष्मण हंचीनमणी यांनी सूत्रसंचालन केले. महालिंग हंजी यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक आप्पासाहेब शिरकोळी, शिवनायक नाईक, प्रभुदेव पाटील, बसप्पा मरडी, सुरेश रायमाने, सुरेश दोडलिंगण्णावर, भारती हंजी, शारदा पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.