अहिल्यानगर : साखर कारखान्यांकडून चालू वर्षी ऊस दर अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत कोणीही ऊसतोडणी किंवा वाहतूक करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. ऊस दर जाहीर न झाल्यास व शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तर एक नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखाने तुलनेने चांगला दर देत आहेत, तर काही कारखाने अगदी कमी दर देत असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलनाची भूमिका संघटनेने घेतली आहे.
याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष अशोक भोसले, मच्छिंद्र आरले, प्रशांत भराट, अमोल देवढे, दादा पाचरणे, हरिभाऊ कबाडी, नारायण पायघन, विकास साबळे, अंबादास भागवत, नानासाहेब कातकडे, मच्छिंद्र डाके आदींनी बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. संघटनेने सांगितले की, जिल्ह्यातील प्रवरा कारखाना ३२०० रुपये, संगमनेर कारखाना ३२०० रुपये आणि गणेश कारखाना ३००० रुपये दर देतो. मात्र, गंगामाई, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर, पैठण व वरखेड यांसारख्या कारखान्यांनी फक्त २७००-२८५० रुपये दर दिला आहे. कारखानदारांना नफा होत आहे. तरीही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले.