बेळगाव : चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याने यावर्षी कमी कालावधीत अधिक ऊस गाळप करून साखर उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादक सभासदांनी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्यालाच पुरवून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी केले. कारखान्याच्या सन २०२५-२६ मधील ऊस गाळप हंगामाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि अमित कोरे यांच्या प्रेरणेतून संचालक मंडळाच्या योग्य निर्णयांमुळे कारखान्याने प्रगती साधली आहे असे ते म्हणाले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कोरे आणि संचालक मंडळाचे सदस्यांनी वजन काटा व ऊस वाहतूक कॅरियरचे विधिवत पूजन केले. कॅरियरमध्ये ऊस टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कॅरियर पूजन सभासद शेतकरी मलकारी यड्रावे दांपत्याच्या हस्ते पार पडले. कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, भरतेश बनवणे, परसगौडा पाटील, संदीप पाटील, महावीर मिरजी, मल्लप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, भीमगौडा पाटील, महावीर कात्राळे, अण्णासाहेब इंगळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. बी. खांडगावे यांसह कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.