अहिल्यानगर : येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२५ च्या गळीत हंगामातील थकीत उसाचे पेमेंट कारखान्याकडून अदा करण्यात आल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली. ऊसतोडणी कामगारांचा राज्यातील पहिला साखर कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख असून, माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी जिद्दीने हा कारखाना उभारला आहे. माजी अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांच्या नियोजनबद्ध कामकाजातून कारखान्याची वाटचाल सुरू असून, ऊस उत्पादक, सभासद व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखान्याची वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी कारखान्याकडून बोधेगाव आणि परिसरातील कार्यक्षेत्रामधून १ लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले होते.
राज्य सहकारी बँकेने कारखान्याला ३९ कोटी ८८ लाख रुपयांचे जमीन तारण कर्ज मंजूर करून ते वर्ग केले. त्यानंतर कारखान्याने क्षणाचाही विलंब न लावता उर्वरित ३१९५ खातेदारांच्या बँक खात्यात ३२.५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. परिसरातील ३६ खेड्यांची ‘कामधेनू असलेल्या या कारखान्यातून अजून उद्योगधंदे उभे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिस्टिलरी प्लॅन्ट लवकरच कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे कसे उपलब्ध होतील. त्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे, असे माजी अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
चालू वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात तीन वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे तो पूर्णतः भुईसपाट झाला. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली होती. परंतु यामध्ये राज्य सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत आणि केदारेश्वर कारखान्याकडून उर्वरित पेमेंट लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आणि बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण होणार असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.