अहिल्यानगर : चालू हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला भाव देण्याचे काम वृद्धेश्वर कारखाना करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वृद्धेश्वर कारखान्यालाच ऊस घालून हा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. वृद्धेश्वर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, उद्धव वाघ, राहुल राजळे, नितीन पवार, बापूसाहेब भोसले, सुभाष ताठे, सुभाष बर्डे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, शेषराव कचरे, बंडूशेठ बोरुडे, बापूसाहेब पाटेकर, काका शिंदे, बंडू पठाडे आदी उपस्थित होते.
संचालक नारायण काकडे व नंदा काकडे यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, सर्वांच्या विश्वासाला पात्र असणारा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याची ओळख आहे. सभासद, शेतकरी यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. खरडून वाहून गेलेली माती कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजळे म्हणाल्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वृद्धेश्वर उद्योग समूहाने २१ लाख रुपयांची मदत केली आहे. या पद्धतीचा मदत करणारा वृद्धेश्वर हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे. कोणताही कारखाना संचालकांनी चुकीचे निर्णय घेतले, तर बंद पडतो. मात्र, या ठिकाणी दूरदर्शीपणे कारभार करण्याचे काम सर्व संचालक करत आहेत. स्व. दादापाटील राजळे व स्व. राजीव राजळे यांनी दूरदर्शीपणाने या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती केल्याने मोठा फायदा कारखान्याला होत आहे. मागील हंगामात २७२३ रुपये दर कारखान्याने दिला होता व या वेळीही चांगला दर देण्याचे काम कारखाना करेल, असे शेवटी राजळे म्हणाल्या. प्रास्ताविक सुभाष ताठे यांनी केले. सूत्रसंचालन आर. बी. शेख यांनी, तर आभार राहुल राजळे यांनी मानले.