हिंजवडी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ या २८व्या गळीत हंगामाला गव्हाणपूजनाने बुधवारी प्रारंभ झाला. भागवताचार्य चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नाना नवले, संचालक माऊली दाभाडे, धैर्यशील ढमाले, धोंडिबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रेय उभे, यशवंत गायकवाड, संदीप काशीद, विलास कातोरे, दत्तात्रेय जाधव, भरत लिम्हण, उमेश बोडके, अतुल काळजे, शिवाजी कोळेकर, लक्ष्मण भालेराव, संचालिका ज्योती अरगडे व शोभा वाघोले, क्रांती शुगरचे चेअरमन ज्ञानेश नवले, नितीन लांडगे, पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे, बबनराव दगडे आदी उपस्थित होते. कारखान्याच्या यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्याचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे म्हणाले, नवीन हंगामासाठी ५७८५ हेक्टर क्षेत्रात ऊस नोंदणी झाली असून, पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता कारखाना केवळ साखर उत्पादनातच नव्हे; तर सहवीज निर्मिती व डिस्टिलरी प्रकल्पांद्वारेही आत्मनिर्भर झाला आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रति एकरी पाचशे अनुदान दिले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या साहाय्याने ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्याचा नवा उपक्रम सुरू आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार खर्च येईल. यापैकी १८ हजार २५० रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून आणि ६,७५० रुपये कारखान्याकडून मिळणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील पहिल्या ५ हजार सहभागी शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावेळी माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक बापूसाहेब भेगडे यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी प्रास्ताविक केले. संचालक चेतन भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक छबुराव कडू यांनी आभार मानले.