पुणे : छत्रपती कारखान्याचे १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट, खोडवा उसाला १०० रुपये अनुदान देणार

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मशिनरी ओव्हरऑइलिंग व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. कारखान्याची वॉटर व एअर ट्रायल घेण्याचे कामे सुरू आहेत. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये १२ हजार ६९८ एकर आडसाली, १६६१ एकर पूर्व हंगामी, २८३८ एकर सुरू व ६,५८० एकर खोडवा ऊस असून एकूण २३ हजार ७७७ एकर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी चालू वर्षी १२ लाख टनापेक्षा जास्त गाळप होणे गरजेचे असून उतारा ही चांगला मिळणे अपेक्षित आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले.

अध्यक्ष जाचक म्हणाले की, कारखाना शासनाच्या निर्देशाप्रमाणे १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यंदा २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये उशिरा तोडणी होणाऱ्या पूर्व हंगामी व सुरू उसास प्रतिटन ७५ रुपये प्रतिटन व खोडवा उसास १०० रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. आडसाली उसाचे गाळप लवकर पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाने उशिरा पूर्व हंगामी, सुरू या उसाला प्रतिटन ७५ रुपये प्रमाणे व खोडवा उसाला १०० रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सभासदांचा फायदा होईल. यावेळी संचालक अँड शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here