मुंबई : साखर आयुक्त कार्यालय स्तरावर विनापरवाना कारखाना हंगाम सुरू केल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. तर अनेक कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत परवानगी मागत आहेत. मात्र, यंदाचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अद्याप एकाही साखर कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही, याची नोंद सर्व कारखान्यांनी घेऊन त्यांचा गाळप हंगाम, मिळाल्यानंतरच परवाना सुरू करावा, असे निर्देश सहसंचालकांनी दिले आहेत.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी विनापरवाना गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांनी गाळप तत्काळ बंद करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे संबंधित विभागाचे नियोजन आहे. त्यासंबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत. ज्या कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केले असेल त्यांनी ते तत्काळ बंद करावे, अन्यथा त्यांना चालू हंगामात गाळप परवाना देण्यात येणार नाही तसेच, त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.