कोल्हापूर : दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चालू महिन्यापासून देशात दर सातत्याने ३५०० रुपयांवर ४००० रुपयांपर्यंत गेले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात एक नोव्हेंबरनंतर नवी साखर बाजारात येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात हंगाम सुरू झाला असला तरी तेथील कारखाने अद्याप जुनी साखरच बाजारात आणत आहेत. त्यामुळे दिवाळी होईपर्यंत तरी साखरेचे दर स्थिर राहतील, त्यात वाढच अपेक्षित असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर अखेरपर्यंत बाजारात फारशी पडझड शक्य नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
बातमीत पुढे म्हटले आहे की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत साखर बाजारातील तेजी कायम आहे. व्यापारातील मागणी तुलनेने स्थिर राहिल्यामुळे मोठे चढउतार दिसले नाहीत. सध्या दिल्ली, मुजफ्फरनगर आणि लखनौ बाजारांतही चागंला दर मिळत आहे. दिल्लीत दर ३७०० ते ३७८० रुपये प्रति क्विंटल असा होता. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील घाऊक बाजारांमध्ये साखरेचे दर ३७५० ते ३८२० रुपये प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतील साखर बाजार तुलनेने स्थिर आहेत. बेंगळुरू आणि चेन्नई येथील बाजारांत दर ३७६० ते ३८४० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान होते. काही व्यापाऱ्यांनी हलकी वाढ नोंदवली असली, तरी मागणी अजूनही मध्यम स्वरूपाची असल्याचे सांगितले.