पुणे : व्हीएसआयचे संशोधन, साखर कारखान्यांत तयार होणार २० पर्यावरणपूरक उपपदार्थ

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ (व्हीएसआय) मध्ये गेल्या तीन वर्षांपासून बदलत्या परिस्थितीत उसाचा प्रत्येक कण वापरून सुमारे २० उपपदार्थ तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. या संशोधनाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून साखरेच्या मुख्य उत्पादनाला स्पर्धा न करता कारखाने पर्यावरणपूरक उपपदार्थ तयार करू शकतील. उसाच्या प्रत्येक घटकाचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात कारखान्यांमध्ये मळी, प्रेसमड आणि बगॅसपासून जैवइंधने, जैवरसायने तसेच मूल्यवर्धित उत्पादने तयार होणार आहेत. ‘व्हीएसआय’मधील मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञान विभागाने उसावर आधारित ‘जैविक शुद्धीकरण केंद्र’ ही संकल्पना पुढे आणली आहे. साखर उद्योगाचे रूपांतर शाश्वत ऊर्जेच्या आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या केंद्रात करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.

व्हीएसआयच्या मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. काकासाहेब कोंडे यांनी सांगितले की, उसापासून सुमारे वीस उपपदार्थ उसापासून तयार करता येणे शक्य आहे, त्यावर ‘व्हीएसआय’ने आराखडा तयार केला आहे. त्यातील काही उत्पादने तयार केले जात आहेत. उत्पादन तयार झाल्यानंतर कारखाने ते स्वीकारतील. सीएनजीसाठी आवश्यक पूरक घटक प्रेसमडमधून तयार केला जात आहे. काही कारखान्यांनी याचे प्रकल्पही राबवले आहेत. पण प्रेसमडमधून केवळ सीएनजी तयार करून चालणार नाही; त्यात सुमारे १० टक्के मेण असते. त्याचे मेण काढण्याचाही आम्ही अभ्यास केला आहे. मेण काढल्यानंतर सीएनजी आणि उरलेला घटक शेतासाठी खत म्हणून उपयोगी ठरणार आहे. मेणाचा वापर सध्या सौंदर्यप्रसाधने, कार पॉलिश, बूट पॉलिश यांसाठी होतो. यावर अधिक संशोधन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here