हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मोठी भेट दिली आहे. उसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) प्रति क्विंटल १५ रुपये वाढ जाहीर करण्यात आली. आता चालू व्हरायटीसाठी किमान आधारभूत किमत आता ४१५ रुपये आणि उशिराच्या उसासाठी ४०८ रुपये प्रति क्विंटल असेल. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात नवीन उसाच्या जातींचे उत्पादनालादेखील चालना दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्याम सिंग राणा यांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत नवीन जातींच्या लागवडीवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, भारतीय किसान युनियन (छधुनी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गुरनाम सिंग छधुनी यांनी उसाची किमान आधारभूत किमती प्रति क्विंटल किमान ४५० रुपये असावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती असे सांगितले. दरम्यान, आता हरियाणामध्ये उसाचा किमान आधारभूत दर पंजाब आणि उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे. पंजाबमध्ये तो प्रति क्विंटल ४०१ रुपये आणि उत्तर प्रदेशात ३७० रुपये आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी किमान आधारभूत किंमत ३५५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. ऊस दर वाढीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशातील सर्वोच्च आधारभूत किंमत देऊन, आम्ही त्यांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ही दिवाळी त्यांच्यासाठी आणखी गोड असेल. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.