कर्नाटक : पाऊस, दिवाळी, ऊस दराच्या अनिश्चिततेमुळे परवाने असूनही अद्याप गाळप बंदच

चिक्कोडी : राज्य सरकारने कर्नाटकमध्ये २० ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, सध्या सुरू असलेला दिवाळीचा सण, अधुनमधून कोसळणारा पाऊस, ऊस दर जाहीर केल्याशिवाय तोडणी सुरू करू नये यासाठी असलेला शेतकरी संघटनांचा दबाव यामुळे गळीत हंगामास अद्याप सुरूवात झालेली नाही. गेल्या हंगामात सर्वच कारखान्यांना हंगाम पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करताना धडपडावे लागले आहे. आताही उसाचे क्षेत्र व उतारा पाहिल्यास यंदाही कारखान्यांना अधिक गाळप करण्याचे आव्हान आहे. वातावरण आणि दिवाळी सणामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील सीमावर्ती साखर कारखान्यांचा हंगाम या आठवड्यात बरोबरीनेच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून दोन्ही राज्याला ऊस पळवापळवीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील आठवड्यात हंगामाला गती येईल.

राज्यात सर्वाधिक कारखाने असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील ३० कारखाने यंदा गळीतासाठी सज्ज आहेत. मात्र, कारखान्यांची एफआरपी सरकारनेही जाहीर केलेली नाही. एफआरपी जाहीर झाल्यानंतर कारखाने दर जाहीर करत असतात. त्यामुळे कारखान्यांकडून दर जाहीर करण्यास विलंब झाला आहे. या भागाला लागून महाराष्ट्रातील कारखान्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात दर अधिक असल्याने त्याकडे ऊस अधिक जाण्याची भीती कर्नाटकातील कारखान्यांना असते. त्यामुळे गाळप लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रापेक्षा आधी ऊस गाळपाची तयारी करण्यात आली असली, तरी सीमाभागातही ऊस दर आंदोलन तापले आहे. कारखान्यांनी वीज उत्पादन, इथेनॉल, डिस्टिलरीसारखे प्रकल्प सुरू केल्याने वाढीव दराची मागणी शेतकऱ्यांची आहे. अद्यापही जमिनीत ओलावा आणि वातावरण ढगाळ आहे. मजूर व शेतकरी दिवाळीच्या धामधुमीत अडकला आहे. ऊस तोडणी मजूर पुरेसे आलेले नाहीत. परिणामी दोन्ही राज्यातील हंगाम एकाच वेळी प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here