कोल्हापूर: राज्यातील साखर कामगारांना १० टक्के पगारवाढीचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यासंदर्भातील अध्यादेश जारी न केल्याने अंमलबजावणी होण्यास विलंब होत होता. शासनाने आदेश तातडीने काढावा, यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला. पाठपुरावा करून राज्यातील साखर कामगारांना १० टक्के पगारवाढीचा अध्यादेश काढण्याबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल जवाहर साखर कामगार संघटनेच्यावतीने कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच १ ऑक्टोबरपासून कलाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे पगारवाढीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याशिवाय, कामगारांना २० टक्के बोनसचा निर्णय घेतल्याबद्दल कामगार संघटनेच्यावतीने आ. राहुल आवाडे, उपाध्यक्ष बाबासो चौगुले व कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा सत्कार करण्यात आला. कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, सेक्रेटरी शांतिनाथ चौगुले, महावीर कल्याणी, दादासो सांगावे उपस्थित होते.












