अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत नाविन्य, आधुनिकीकरणाची कास धरत मार्गाक्रमण केले आहे. सहकारावर खाजगीकरणाचे अनेक घाव पडले तरीही सहकार न सोडता त्यातुन शेतकऱ्यांना वाचवून उभे करण्याचे काम संजीवनी समुहाने केले. त्याच्या ६५ वर्षांच्या प्रगत कारकिर्दीची माहिती युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशाचे पहिले सहकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सादर केली. केंद्र शासनातील मंत्री, विविध खात्याचे सचिव, नाबार्ड, राष्ट्रीय सहकारी संघ, यांच्याबरोबरच सहकारक्षेत्राशी संलग्न पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी दिली.
अध्यक्ष बिपीनराव कोल्हे म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अलिकडेच देशातील पहिला बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे. ग्रामीण अर्थकारण मजबूत करून शेतकऱ्यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविणे हे स्वप्न माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिले होते ते साकारण्याचे प्रत्येक उद्दिष्ट संजीवनीने पूर्ण केले आहे. केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त देशातील सहकार चळवळ अधिक सदृढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. या अंतर्गत विविध माहिती संकलित केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील चर्चेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी पुन्हा युवानेते विवेक कोल्हे यांना बोलावले आहे.

















