साखरेचा भाव प्रति क्विंटल ४३०० रुपये गरजेचा : ‘विश्वास’चे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक

सांगली : केंद्र शासनाने साखरेची कमित कमी विक्री किंमत ४ हजार ३०० रुपये क्विंटल करणे गरजेचे आहे, तरच साखर कारखानदारी टिकेल, असे प्रतिपादन ‘विश्वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. यावर्षी सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले. चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे महायोगी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज होते. मानसिंगराव नाईक म्हणाले, पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांसह साखर व्यवसायाला गेल्या दोन, तीन वर्षात मोठा फटका बसत आला आहे. उसाचे एकरी उत्पादन घटले आहे. कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रमुख वारणा, मोरणा व कडवी नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकासह सर्व पिकांचे नुकसान होत आहे.

अध्यक्ष नाईक म्हणाले, केंद्र शासनाने सातत्याने उसाच्या किमान खरेदी दरात वाढ केली आहे. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ केलेली नाही. आम्ही उसाच्या आधारभूत किमतीपेक्षा (एफआरपी) जास्तीचा म्हणजेच ३ हजार २७५ रुपये दर दिला आहे. या गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी स्वागत केले. पीर पारसनाथ यांच्याहस्ते वजन काटा पूजन करण्यात आले. त्यांच्यासह अध्यक्ष, संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ केला. यावेळी संचालक विराज नाईक, दिनकरराव पाटील, हंबीरराव पाटील, सुरेश चव्हाण, विश्वास पाटील, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, सुकुमार पाटील, तुकाराम पाटील, आनंदराव पाटील, यशवंत दळवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here